Thursday, November 8, 2012



" आनंदपर्व "
ICT  च्या लाडक्या मराठमोळ्या 'मंथन क्लब'ने दि. ५ नोव्हेंबर २०१२ रोजी डॉ . विकास आमटे यांच्याशी संवाद घडवून रसिक प्रेक्षकांना एक आगळीवेगळी आणि अभूतपूर्व भेट दिली. अशा या ग्रेट भेटीला संस्थेचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव सर,  माजी कुलगुरू डॉ. जे. बी. जोशी सर तसेच मंथन क्लब चे सल्लागार प्राध्यापक भागवत सर यांची उपस्थिती लाभली. याबरोबरच सर्व विद्यार्थी  गण तसेच प्राध्यापक वर्ग आणि सर्व रसिक श्रोत्यांची सुद्धा उपस्थिती स्तुत्य होती. 
कार्यक्रमाची सुरुवात झाली गान वृंदाने सदर केलेल्या एका सुरेख गीताने. 'आनंदवन' तसेच बाबा आमटे यांचे कार्य आणि विकास आमटे यांची थोडक्यात ओळख करून झाल्यावर सुरु झाला तो 'त्यांच्या स्वप्नांचा प्रवास'. 
आनंद वनावर चित्रित केलेल्या एका चित्र फितीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. (http://www.youtube.com/watch?v=etoWJTeYG1E).
      बाबा आमटे हे एक वकील होते हे तेव्हा प्रथमच कळले. समृद्ध घराण्यात वाढलेले बाबा , म्हणजेच 'मुरलीधर देविदास आमटे', म्हणजे मानवतेचा महामानवी अवतारच. जीवनातील 'त्या' एका घटनेमुळे जेव्हा त्यांच्या 
जीवनाची दिशा बदलली, नव्हे त्यांनी ती  दिशा स्विकारली , ते पाहताना अंगावर शहारे आले.. सुरुवातीला त्यांच्या या वेगळ्या प्रवासात येणारे अडखळे पार करून जिद्दीने त्यांनी आपले कार्य पुढे नेले ते पाहून मन भारावून जाते. या खडतर प्रवासामध्ये त्यांना त्यांचं कुटुंबियांची फार मोलाची साथ  लाभली . यानंतरच्या भागात आनंदवनाची वाटचाल आणि सध्या तिथे चालवले जाणारे प्रकल्प यांची माहिती दिली गेली. अपंग, कुष्ठरोगी, अंध आणि अशा अनेक समाज बांधवांना , ज्यांना समाजाने झिडकारले, नाकारले, त्यांना बाबांनी आसरा दिला, त्यांना त्यांचं पायावर उभे केले आणि एवढेच नाही, तर त्यांना एक नवे ‘आयुष्य’ दिले!
याच चित्रफितीमध्ये पुढे ‘आनंदवना’तील कुष्ठरोगी, तसेच अंधा, अपंग रुग्णांसाठी चालवले जाणारे विकासकार्य याबद्दल माहिती दिली गेली. समाजाच्या चहुबाजूंनी येणाऱ्या नाकारात्माकातेला दूर ठेवून हे आपुलकीचे घर उभे करणे हे किती महान कार्य आहे याची प्रचीती तेव्हा आली. विज्ञान आणि तंत्राज्ञानाचा कोणी किती विनम्रपणे समाज कल्याणसाठी सदुपयोग करू शकतो , याचे जिवंत उदाहरण म्हणजे ‘आनंदवना’तील कार्यक्षमतेला वाव देणारे प्रकल्प.

       “माणूस एक वेळ हातांशिवाय जगू शकेल, पण तो स्वाभिमानाशिवाय जगू शकत नाही” हे वाक्य मनाला जाऊन भिडते. तेथील उपचार घेऊन बरी अझालेल्या रुग्णांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, पादत्राणे, अन्नधान्य आणि तसेच आणखी अनेक उत्पादने पाहून जाणवलं, की माणसाच्या मनातील इच्छाशक्तिच्या जोरावर तो आपल्यासमोरील कितीही मोठ्या संकटावर मात करू शकतो. “आनंदवनातील आसरया शिवाय आणि बाबांनी दिलेल्या आधाराशिवाय त्या कलाकारांना कदाचित त्यांच्यातील ‘कलाकारा’ची जाणीवच झाली नसती.”
       यानंतर डॉ. प्रकाश आमटे यांनी आपले अनुभव सांगायला सुरुवात केली. “आम्ही संन्याशाची पोरं आहोत” या त्यांचं उद्गारातून त्यांचे बाबांशी असलेले जवलीकतेचे नाते दिसून येते. “ही बाबा आमटे एन्ड सन्स प्राईव्हेट लिमिटेड नाही” यातून त्यांची सर्वसमावेशक विचारसरणी दिसून येते. बाबांच्या जीवनातील अनेक पैलू उलगडून दाखवत डॉ. प्रकाश आमटे यांनी श्रोत्यांना एका धाडसी अशा आनंदवनाच्या वाटचालीची शब्दांतूनच सफर घडवली. बाबांनी राजकारण्यांच्या मनमानीविरुद्ध निषेध म्हणून जेव्हा आपल्याला मिळालेले सर्व पुरस्कार परत करण्याचे धाडस दाखवले, ते कौतुकास्पदच होते. मनाला उल्हासित करणाऱ्या अशा बाबांच्या कविता मनाहाजे तर उत्स्फुर्तपणाचे परिमाणाच. बाबांना त्यांच्या खडतर प्रवासात अनेक लोक भेटले. काही सामान्य तरत काही प्रतिष्ठीत आणि नामवंत. या सर्वांकडून त्यांनी नेहमीच चांगले काही घेतले व नेहमीच सर्वांना चांगले काही नविन शिकवले. राजकारण्यांनाही अशा या आनंदवनाची ख्याती भुरळ न पाडावी तर नवलच. पण राजकारण आणि समाजसेवा यांना नेहमीच एकमेकांपासून थोड्या अंतरावर ठेवण्याचे काम बाबांनी केले.
       थोर समाजसुधारक आचार्य विनोबा भावे यांनी बाबांना ‘ब्रम्हचर्य’ स्वीकारण्याचा सल्ला दिला असताना बाबांनी दिलेला प्रतिसाद म्हणजे – “जो खेळ तुम्ही खेलेलेला नाही त्याची अंपायरिंग का करावी” .
       बाबांच्या या वाटचालीमध्ये त्यांचं सहचारिणी सौ. साधनाताई आमटे  यांची त्यांना फार मोलाची साथ लाभली. एका थोर विचारवंताने म्हटले होते- “मी जगाला दिशा देणारे अनेक सन्यासी पुरुष तर पहिले आहेत, पण प्रथमच असे थोर सन्यासी जोडपे पहिले- ते म्हणजे बाबा आमटे आणि साधनाताई आमटे. “
       इंजिनियरिंग चे शिक्षण घेण्याची इच्छा असतानासुद्धा , बाबांचे कार्य पाहून याच क्षेत्रामध्ये कार्य करण्याची इच्चा डॉ. विकास आमटे यांच्या मनात निर्माण झाली आणि “हे काम आधी जास्त महत्त्वाचे आहे” या जाणीवेने त्यांनी डॉक्टरकिचे शिक्षण घेतले. ‘इंग्लंड’ मध्ये झालेले डॉ. विकास आमटेंचे लग्न, बाबांना मिळालेला सर्वोच्च पुरस्कार, गांधींच्या नावाने पुरस्कार मिळालेला असतानासुद्धा आनंदवनात दुर्मिळ असणारा महात्मा गांधींचा फोटो, बाबांचे ‘नर्मदा बचावो’ आंदोलनास दिलेले अमूल्य योगदान या आणि अशा अनेक नव्या गोष्टी या निमित्ताने जाणून घ्यायला मिळाल्या.
       तरुणांना समाजकार्यात निस्वार्थपणे सहभागी होण्याची प्रेरेना देऊन डॉ. विकास आमटे यांनी श्रोत्यांमध्ये आपल्या सामाजिक कर्तव्याची जाणीव करून दिली.

       यानंतर डॉ. जी. डी. यादव यांनी डॉ. आमटेंचे आभार मानून त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे बाबांनी सुरु केलेल्या या महान कार्याला पुढे नेण्याबद्दल कौतुक केले. याबरोबरच आपल्या संस्थेतूनही उत्स्फूर्त मदत मिळेल अशी अशा व्यक्त केली.
       प्रा. भागवत सर् यांनी आजच्या पिढीला स्वत:चे करिअर घडवतानाच आपल्या समाजाच्या प्रगतीला हातभार लावण्याचेही सुचवले. यावेळी त्यांनी “वायुच्या विरुद्ध जाणारा – तो युवा “ अशी ‘युवा’ या शब्दाची नवी व्याख्या सांगून सर्वांचीच मने जिंकून घेतली.
       यानंतर श्री. सुयोग मराठे (पी. एच .डी. ऑर्गनिक केमिस्ट्री, मुंबई विद्यापीठ) यांनी तरुण मंडळींना एकत्र येऊन सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होण्याची गरज व्यक्त केली. याबरोबरच मुंबईसारख्या शहरात युवा पिढीच्या मदतीने आनंदवनातील कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची सदिच्छा व्यक्त केली.
       कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होऊन सार्वजण मनात एक नवा विचार, एक नवा ध्यास घेऊन परतले. माणुसकीच्या उज्ज्वल रूपाचे दर्शन सर्वांनाच घडले होते. या माणुसकीचं भावनेची जाण नेहमीच आपल्या मनात जिवंत राहील , असा सर्वांनी यावेळी मनात निर्धार केला.