Saturday, March 23, 2013




“ त्यांच्या स्वप्नांचा प्रवास “
एका अवलियाची मुशाफिरी








                    'मंथन' द्वारे आयोजित कार्यक्रमांमध्ये आतापर्यंत अनेक कलावंत, सामाजिक चळवळींमधले थोर लोक, साहित्यिक , कवी, तसेच समाजातील अनेक प्रतिष्ठावंत मंडळी सहभागी झाली. अनेकांनी आपल्या आठवणींचा खजिना आपल्यासमोर ठेवला. जीवनातील सर्वांनाच पडणाऱ्या अनेक प्रश्नांची त्यांनी आपल्या परिनं उत्तरं कशी शोधली हे सुद्धा त्यांनी आपल्यासमोर मांडलं. या सर्वांची हातचं काही राखून न ठेवता आपल्या अनुभवांची शिदोरी सर्वांसोबत वाटून घेण्याची इच्छा सर्वांनाच भावली.


अशा या मंतरलेल्या रसिकांना भेटण्यासाठी आज ICT मध्ये एक ‘मुशाफिर’ अवतरला होता. त्यांची ख्याती फक्त महाराष्ट्रात किंवा भारतात नाही, तर संपूर्ण जगात पसरलेली आहे. त्यांनी लहानशा गावापासून आपल्या आयुष्याची सुरुवात करून ते अमेरिकेतल्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपल्या प्रतिभेची झलक कशी दाखवली, नव्हे तर त्या कंपन्या कश्या गाजवल्या हे त्यांच्याच वाणीतून ऐकण्यासाठी रसिक प्रेक्षकांचा ( नेहमीप्रमाणे ) जनसागर उसळला होता. त्यांचे सामान्यातले असामान्य जीवन, वेगवेगळया विषयांतील त्यांचा लीलया होणारा वावर, आणि त्यांची सातासमुद्रापार गाजलेली पुस्तके या सगाळ्यांचाच परिणाम म्हणून काय, तर ‘ अच्युत गोडबोले ‘ यांना भेटण्यासाठी आज ICT तील सारे रसिक श्रोते उत्साहाने जमले होते.


              आजपर्यंत त्यांच्या पुस्तकांतून आणि दूरचित्रवाणी वरच्या मुलाखतींमधून भेटलेले गोडबोले आज प्रत्यक्ष आपल्यासमोर आपल्याशी हितगुज करणार आहेत ही भावना सुद्धा मन उल्हासित करणारी होती. मोठमोठी पदे भूषवून सुद्धा सामान्यांशी असणारा त्यांचा मनाचा धागा कधी तुटला नाही. अशा या अवलियाने आपल्या जीवनात अनेक कलांशी, अनेक विषयांशी, अनेक क्षेत्रांशी मैत्री साधून आपल्या प्रतिभेची जाणिव जगाल करून दिली होती. जगभर त्यांनी व्यवसायानिमित्त प्रवास केला आणि तरीही आपल्या मातृभूमीला पवित्र मानून येथील समाजाचा उद्धार करण्याचेही थोर कार्यही केले आणि करत आहेत.


सर्वांनाच त्यांनी जगलेले जीवन एका रम्य आणि अचंबित करणाऱ्या कथेप्रमाणे स्वप्नवत वाटत असल्याने  ‘ त्यांच्या स्वप्नांच्या प्रवास – एका अवलियाची मुशाफिरी ‘ हे कार्यक्रमाचे नाव सुद्धा सार्थ होते.  



यानंतर श्री. अच्युत गोडबोले यांचे आगमन झाल्यावर रसिकांनी त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंकिता आणि विवेक यांनी गोडबोले सरांचा यांचा थोडक्यात परिचय करून दिला. हा परिचय, खरं म्हणजे एखाद्या माणसाच्या जीवनातील उत्स्फूर्त ऊर्जा, सतत नवीन काही शिकण्याची ओढ आणि सचोटी यांचे तंतोतंत चित्रण शोभेल असेच वाटतं.

यानंतर गोडबोले सरांनी आपले मनोगत सांगण्यास सुरुवात केली. सारा प्रेक्षकवर्ग मन एकवटून ऐकू लागला.

गोडबोले सरांनी आपल्या स्वप्नांचा प्रवास कथन करताना अगदी लहानपणापासूनच्या, म्हणजे सोलापूरच्या शाळेतील गमतीजमती, तेथील त्यांचे गुरुजन , मित्रमंडळी, घरचे संस्कार या सगळ्याचा त्यांच्या जडणघडणीत असलेला मोलाचा वाटा याबद्दल सांगितले. लहानपणापासूनच त्यांना लाभलेला पं. भीमसेन जोशी, विंदा करंदीकर, कुमार गंधर्व अशा दिग्गजांचा सहवास अशा त्यांच्या आठवणीने सर्वजण भारावून गेले.  शालेय वयापासूनच लागलेली संगीत, साहित्य, कला यांची गोडी त्यांनी पुढील आयुष्यात सुद्धा कशी जपली हे त्यांच्याकडून ऐकायला मिळाले.

बोर्डात चांगला क्रमांक येऊन त्यांनी नंतर पवई च्या आय. आय. टी. मध्ये प्रवेश मिळवला. यानंतरचं त्यांचं जीवन म्हणजे विज्ञान- तंत्रज्ञान यांच्याबरोबरीने संगीत, साहित्य व कला यांचा मधुर मिलाप आहे. या ४ वर्षांमध्ये त्यांनी ज्या प्रकारे आपल्या आवडी निवडी जपतांना दिलखुलासपणे त्यामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि ज्या प्रकारे कोणताही विषय परका न मानता त्याचा खोलवर अभ्यास आणि चिंतन करण्याचे धाडस दाखवले ते पाहून सर्वच जण अचंबित झाले. 


गोडबोले सरांच्या नंतरच्या आयुष्यात त्यांनी शहाद्याच्या भिल्ल आदिवासींच्या हक्कांसाठी त्यांच्या बरोबरीने राहून लढा दिला. त्यांचे संगठन आणि त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे हे काम त्यांनी प्राणपणाने केले आणि त्यातील एका शांततापूर्ण आंदोलनापायी एकदा १० दिवसांचा तुरुंवासही भोगला. गोडबोले सरांची ही निर्भय आणि क्रांतिकारी, तरीही वैचारिक वृत्ती सर्वांच्या मनात एक आशेचा किरण दाखवून गेली.


मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सर्वोच्च पदावर काम करत राहूनही त्यांनी अनेक नव्या गोष्टी शिकल्या आणि त्या सोप्या शब्दात सर्वांना समजतील अशा रुपाने आपल्या पुस्तकांतून मांडल्या. या काळातील त्यांचा जीवनपट जेव्हा त्यांनी उलगडून दाखवला, तेव्हा रसिक प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या रुपात त्यांच्या जिद्दीला दाद दिली. जीवनात आलेली अनेक कौटुंबिक आणि आर्थिक संकटे यांचे त्यांनी दुःख करत बसण्याऐवजी त्यांना एक आव्हान मानून त्यावर संपूर्ण प्रयत्नांनिशी मात केली. त्यांच्या जीवन संघर्षाला सर्व रसिक श्रोत्यांनी मनोमन सलाम केला.

यानंतर त्यांनी त्यांच्या लिखाणाबद्दल रसिकांशी हितगुज केली. त्यांच्या लिखाणासाठी त्यांना लागणारी प्रेरणा आणि त्यासाठी त्यांनी केलेले अफाट वाचन हे सर्वांनाच अचंबित करणारे होते. माणसाने आपल्यातील कलेसाठी असणारी ओढ नेहमी जपली आणि जोपासली पाहिजे असा त्यांचा आजच्या पिढीला प्रेमाचा संदेश होता. संगणकाच्या क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध तांत्रिक पुस्तके आणि त्याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान , राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्रासारखे गुंतागुंतीचे विषय सोपे करून सामान्यजनांना सांगणारी पुस्तके असा त्यांच्या लेखनाचा आवाका फार मोठा आहे. आपल्या कलेच्या आणि साहित्याच्या आवडीला धरून या विषयांवर सुद्धा त्यांनी अनेक लोकप्रिय पुस्तके तसेच वर्तमानपत्रांतील सदरे लिहिली. या सर्व विविध विषयांवरील लेखनाचे रहस्य सांगताना त्यांनी विनम्रपणे आपण एक चांगले ‘इंटेग्रेटर‘ असण्याचा खूप फायदा झाल्याचे विनम्रपणे सांगितले. 




एखाद्या माणसाचे आयुष्य परस्पर विरोधी घटनांनी भरलेले असू शकते . पण या घटनांमधील अंतर दक्षिण धृव आणि उत्तर धृव यांच्या इतके सुद्धा असू शकते याची जाणीव गोडबोले सरांना ऐकल्यानंतर झाली. कार्यक्रमाची सांगता करतांना त्यांनी सर्वांनाच प्रेरणादायी असे काही किस्से सांगितले आणि आपल्या मनोगताचा समारोप केला.

प्रश्नोत्तराच्या वेळात अनेकांच्या मनातील बऱ्याच दिवसांपासून असलेल्या प्रश्नांची गुंतागुंत त्यांनी अलगदपणे सोडवली.

यानंतर प्रा. भागवत सर यांनी श्री. अच्युत गोडबोले यांच्या आभार मानले आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण जीवनगाथेतून तसेच प्रेरणादायी अशा पुस्तकांमधून नक्कीच आजची तरुण पिढी एक नवा ध्यास घेईल अशी आशा व्यक्त केली. मंथन सचिव नितेशने कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्यांचे हातभार लागले त्या सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

परत जाताना प्रत्येकाच्या मनात एकाच विचार मनात होता – आपले आयुष्य हे आपण कसे जगतो हे खरे तर आपल्याच हातात असते. आयुष्यात पुढे जाताना अनेक गोष्टी मागे पडत जातात. अनेक कलांची, आवडी- निवडीची साथ सुटत जाते. पण खरे आयुष्य जगणे म्हणजे जीवनातील अनेक रंगांमध्ये पूर्णपणे बुडून जाणे हेच असते. कोणतीही गोष्ट आपलीशी केली, ती प्राणपणाने जपली, तर नक्कीच जीवनाच्या एखाद्या वळणावर आपल्याला साथ देते. 

No comments:

Post a Comment